खेड : फुरूसमध्ये घरफोडी करणारा संशयित रंगेहात पकडला, आठवडाभरापासून सुरू होती घरफोडी, पंधेरी गावातील असल्याची माहिती

banner 468x60

खेड तालुक्यातील फुरूस परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी रात्री एका बंद घरात संशयास्पद हालचाल आढळल्यानंतर गावातील सतर्क तरुणांनी घटनास्थळी धाव घेत घरफोडीचा संशय असलेल्या व्यक्तीला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अनुज रमेश कावणकर (रा. पंधेरी दाभोळ, ता. दापोली) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयिताचे नाव असल्याचे समोर आले आहे.

फुरूस गावात मागील काही दिवसांपासून सायंकाळनंतर अंधार पडल्यानंतर बंद घरांना लक्ष्य करून घरफोडीचे प्रकार घडत होते. काही घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी चोरीच्या एका घटनेतील संशयित व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली होती. मात्र पोलिसांत तक्रारी दाखल होऊनही संशयिताचा ठोस मागमूस लागत नसल्याने ग्रामस्थ अधिकच चिंतेत होते.

दरम्यान, मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास बंद घराच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाला घरामध्ये अचानक दिवा लागल्याचे दिसून आले. घरातील व्यक्ती उपस्थित नसताना घरात प्रकाश दिसल्याने त्याला संशय आला. त्याने तत्काळ गावातील इतर तरुणांना फोन करून घटनास्थळी बोलावले.

काही वेळातच सुमारे १५ ते २० तरुण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित घराला चारही बाजूंनी गराडा घातला आणि घरातून संशयित व्यक्ती बाहेर येण्याची वाट पाहू लागले. काही वेळाने घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच तरुणांनी त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, बातमी लिहिताना पंचनाम्याचा सविस्तर तपशील उपलब्ध झालेला नसल्याने घरातून नेमकी कोणती मालमत्ता चोरीला गेली किंवा चोरीचा प्रयत्न कितपत यशस्वी झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती.

जंगलात वास्तव्य केल्याची माहिती

पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयिताचे मागील चार-पाच दिवसांपासून तांबड परिसरातील जंगलात वास्तव्य असल्याची माहिती समोर आल्याचे वृत्त आहे. फुरूस परिसरात मागील काही दिवसांत घडलेल्या घरफोडीच्या घटनांमध्येही त्याचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

संशयिताकडे अधिक चौकशी केल्यानंतर फुरूस परिसरातील घरफोडीच्या घटनांमागील धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

सतर्क तरुणांच्या धाडसाचे कौतुक

घरातील संशयास्पद हालचाल ओळखून तातडीने इतर तरुणांना माहिती देणे आणि एकत्रितपणे संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात देणे, याबद्दल फुरूसमधील ग्रामस्थांकडून तरुणांचे कौतुक होत आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे संशयित पोलिसांच्या हाती लागल्याने गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा श्वास घेतला आहे.

दरम्यान, रात्रीच्या वेळी परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *