गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

banner 468x60

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि कोंडीमुक्त व्हावा, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर गणेशोत्सवादरम्यान १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक ग्रॉस वजनक्षमता असलेल्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. परिवहन विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईसह राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आणि गणेशभक्त कोकणात दाखल होतात. या काळात एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणावर जादा बसेस सोडल्या जातात. त्याचबरोबर खासगी वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढते. महामार्गावर अवजड वाहने, ट्रेलर्स तसेच रेती-वाळू वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते.

प्रवाशांचा वेळ वाचावा आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, या उद्देशाने मोटार वाहन अधिनियमातील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

कधी असेल अवजड वाहनांना बंदी?

मूर्ती आगमन व पूर्वतयारीचा प्रवास

११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ते १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी राहणार आहे.

पाच दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी

१८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंदी लागू राहील.

गौरी-गणपती विसर्जन व परतीचा प्रवास

१९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत, तसेच २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत निर्बंध लागू राहतील.

अनंत चतुर्दशी व मोठ्या प्रमाणावरील परतीचा प्रवास

२५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असेल.

या वाहनांना बंदीतून सवलत

अवजड वाहनांवरील निर्बंधांमुळे जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवांवर परिणाम होऊ नये, यासाठी शासनाने काही वाहनांना बंदीतून वगळले आहे.

बंदीतून खालील वाहनांना सवलत देण्यात आली आहे :

  • जेएनपीटी आणि जयगड बंदरातून आयात-निर्यात होणाऱ्या मालाची वाहतूक करणारी वाहने.
  • दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे एलपीजी सिलिंडर, औषधे, लिक्विड ऑक्सिजन, भाजीपाला, अन्नधान्य आणि नाशवंत माल वाहून नेणारी वाहने.
  • रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर अत्यावश्यक सेवांची वाहने.
  • मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी साहित्य वाहून नेणारी वाहने. मात्र, अशा वाहनांना वाहतूक पोलीस किंवा महामार्ग पोलिसांचे प्रवेशपत्र आवश्यक राहणार आहे.

दरम्यान, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होण्यास मदत होणार असून, मुंबई-गोवा महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासही मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *