रत्नागिरी : कुवारबावमध्ये 31 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, घटनेने परिसरात हळहळ

banner 468x60

रत्नागिरी शहरातील कुवारबाव परिसरातील वृंदावन सोसायटी येथे ३१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी, ७ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे कुवारबाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शंन्मुख आप्पासाहेब निंबाळ (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंन्मुख निंबाळ हे कुवारबाव येथील वृंदावन सोसायटीमध्ये पत्नी साधना निंबाळ यांच्यासह राहत होते. ७ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजेपर्यंत ते उठले नसल्याने पत्नी साधना त्यांना उठवण्यासाठी टेरेसवर गेल्या. त्यावेळी टेरेसवरील लोखंडी अँगलला काळ्या रंगाच्या केबलच्या सहाय्याने शंन्मुख यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी आणि उपस्थितांनी त्यांना तातडीने खाली आणून उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. खासगी रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तपासणी केली; मात्र दुपारी १२.३५ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी नोंद घेतली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १०७/२०२६ नुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.

शंन्मुख निंबाळ यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. आत्महत्येपूर्वी त्यांच्यावर कोणता ताण किंवा अन्य कारण होते का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. घटनास्थळाची पाहणी तसेच संबंधितांकडून माहिती घेऊन या घटनेमागील कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, ३१ वर्षीय तरुणाच्या अशा प्रकारे झालेल्या मृत्यूने कुवारबाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून निंबाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *