चिपळूण : स्वर घागची तायक्वांदोमध्ये सुवर्ण झेप, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

banner 468x60

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल, सावर्डे येथील विद्यार्थी स्वर संदीप घाग याने तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत दमदार कामगिरी करत ३८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याची राजापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

चिपळूण येथील बांधल हायस्कूलमध्ये सोमवारी झालेल्या तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत स्वरने आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्याच्या या यशामुळे शाळेसह सावर्डे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वरने यापूर्वीही तायक्वांदोच्या विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०२५ मध्ये तायक्वांदो असोसिएशनच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ओपन चॅलेंज फाईटमध्ये कांस्यपदक, फ्रीस्टाईल पुमसे प्रकारात कांस्यपदक तसेच शालेय तायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदक, अशी एकूण तीन पदके त्याने मिळवली होती. यंदा मात्र त्याने आपल्या मेहनतीला सुवर्ण यशाची किनार देत सुवर्णपदकावर नाव कोरले.

स्वरने ऑक्टोबर २०२४ पासून सावर्डे येथील अमेय क्लासेसमध्ये प्रशिक्षक भरत करार, ऋतूज मते आणि रुद्रसर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे व तायक्वांदोचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. नियमित सराव, कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यामुळे त्याने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधली.

स्वरच्या या यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक, प्रशिक्षक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही स्वर उत्कृष्ट कामगिरी करत सावर्डे, शाळा आणि चिपळूण तालुक्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून त्याला पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *