संगमेश्वर तालुक्यातील साडवली पार येथे कत्तलीच्या उद्देशाने दोन बैलांची अवैधरित्या वाहतूक करताना पाच जणांविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत बैलांसह बोलेरो पिकअप असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
ही घटना रविवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास साडवली पार येथे उघडकीस आली. याप्रकरणी श्रीधन तानाजी बाळेकुंद्री (वय ३०, रा. साडवली साईनगर, ता. संगमेश्वर) यांनी देवरुख पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी परस्पर संगनमत करून दोन बैलांची वाहतूक बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एमएच-१०-झेड-८८६७ मधून केली. प्राणी वाहतुकीचा आवश्यक परवाना नसताना बैलांना गाडीच्या हौद्यात वेदना होतील अशा प्रकारे आखड दोरीने करकचून बांधण्यात आले होते. तसेच त्यांना हालचाल करता येणार नाही अशा दाटीवाटीने गाडीच्या हौद्यात भरून कासारवाडी ते मलकापूर अशी वाहतूक केली जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात आरोपी माणिक शंकर कदम (४४, रा. पाटीलवाडी आंबा, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर), वसंत चंद्राप्पा कांबळे (४८, रा. चांदोली बौद्धवाडी, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर), विक्रम राजाराम पवार (५४, रा. साखरपा पत्कीवाडी, ता. संगमेश्वर), उदय मांगले (रा. साडवली, पूर्ण नाव माहित नाही) आणि राजेंद्र रविकांत मोहिरे (५४, रा. कासारवाडी, साडवली, ता. संगमेश्वर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी कारवाईदरम्यान सुमारे आठ वर्षे वयाचा काळ्या रंगाचा गावठी जातीचा बैल आणि सुमारे सात वर्षे वयाचा तांबड्या रंगाचा जर्सी जातीचा बैल, प्रत्येकी अंदाजे १५ हजार रुपये किमतीचा, असा एकूण ३० हजार रुपयांचा पशुधन जप्त केले. तसेच सुमारे ३ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३ लाख ३० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अधिनियम, प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, मोटार वाहन कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













