रत्नागिरी-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात कोसळलेली भलीमोठी दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड कोसळून तब्बल २४ तास उलटूनही मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला नसल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
मोठमोठे दगड आणि मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून, घाटमाथ्यापलीकडील १५ ते २० गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क प्रभावित झाला आहे.
दरड कोसळली त्यावेळी अकलपे-खेड मार्गावरील एसटी बसही घाटात अडकली होती. बसमध्ये शालेय विद्यार्थी, महिला आणि अन्य प्रवासी होते. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन ही बस पुन्हा अकलपेच्या दिशेने पाठवण्यात आली.
दरम्यान, शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने दरड हटवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, रस्त्यावर आलेले दगड अत्यंत मोठे असल्याने ते हटवण्यात अडचणी निर्माण झाल्या.
अखेर शनिवारी सकाळपासून ब्रेकर मशीनच्या सहाय्याने महाकाय दगड फोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दगड फोडल्यानंतर त्यांचा ढिगारा बाजूला करून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि यंत्रसामग्री घटनास्थळी तैनात असून, शनिवारी सायंकाळपर्यंत रघुवीर घाट वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न विभागाकडून केला जात आहे.
रघुवीर घाट हा रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने मार्ग बंद झाल्याचा मोठा फटका विद्यार्थी, नोकरदार, एसटी प्रवासी, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना बसला आहे. मार्ग कधी सुरू होणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













