समुद्राची धोकादायक स्थिती अद्याप कायम असल्याने गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा गुरुवार, ३ सप्टेंबरपासून पुन्हा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रवीण चौधरी यांनी दिली.
गणपतीपुळे समुद्रकिनारा समुद्राच्या धोकादायक स्थितीमुळे मागील दोन महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. तब्बल ६० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सुमारे आठवडाभरापूर्वी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, समुद्रातील धोकादायक परिस्थिती अद्याप कायम असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी समुद्रकिनारा पुन्हा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांतच समुद्रकिनारा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
समुद्रकिनारा दीर्घकाळ बंद असल्याने स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी झालेल्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत समुद्रकिनारा पुन्हा सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला केला होता. मात्र, अल्पावधीतच पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
दरम्यान, समुद्राची परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत पर्यटकांनी समुद्रात उतरणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













