चिपळूण : फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी 10 हजारांची लाच प्रकरणी मंडळ अधिकाऱ्याला एक दिवसाची पोलीस कोठडी, उमेश राजेशिर्के यांच्या मालमत्ता व आर्थिक व्यवहारांचीही होणार चौकशी

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलेल्या मंडळ अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे चिपळूण महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, लाच स्वीकारल्याच्या प्रकरणासोबतच राजेशिर्के यांनी कमावलेल्या मालमत्ता, संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराने मौजे चिपळूण येथील भूमापन क्रमांक १७४/१३ ही जागा खरेदी केली होती. सदर जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर स्वतःचे तसेच पत्नीचे नाव दाखल व्हावे आणि त्यासंदर्भातील फेरफार नोंद मंजूर व्हावी, यासाठी तक्रारदाराने संबंधित महसूल कार्यालयात अर्ज केला होता. त्यानुसार ११ जून २०२६ रोजी फेरफार नोंद घेण्यात आली होती.

मात्र, त्यानंतर मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के यांनी ७ जुलै २०२६ रोजी सदर फेरफार नोंद रद्द केली. फेरफार नोंद रद्द झाल्यानंतर तक्रारदाराने याबाबत राजेशिर्के यांची भेट घेतली. महसूल कर्मचारी पतसंस्थेत झालेल्या या भेटीदरम्यान रद्द झालेली फेरफार नोंद पुन्हा मंजूर करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्यास नकार दिल्यानंतरही संबंधित मंडळ अधिकाऱ्याकडून पैशांसाठी तगादा सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. २३ ऑगस्ट तसेच २७ ऑगस्ट रोजी फोन करून फेरफार नोंद मंजूर करण्याच्या बदल्यात मागितलेल्या लाचेच्या रकमेसाठी तक्रारदारावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे.

अखेर या प्रकाराला कंटाळून तक्रारदाराने २ सप्टेंबर २०२६ रोजी रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.

बुधवारी सायंकाळी नियोजनानुसार कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या गाडीत १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

दरम्यान, राजेशिर्के यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणातील तपासासाठी त्यांची कोठडी आवश्यक असल्याचे तपास यंत्रणेकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने राजेशिर्के यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार तपासण्याची शक्यता

लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याच्या कारवाईनंतर आता तपास यंत्रणेचे लक्ष राजेशिर्के यांच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांकडेही लागले आहे. त्यांनी सेवाकाळात कमावलेल्या विविध प्रकारच्या मालमत्ता व संपत्तीची माहिती तपासण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत संपत्तीचे प्रमाण, आर्थिक व्यवहार तसेच मालमत्ता खरेदीसाठी वापरण्यात आलेल्या पैशांचा स्रोत याबाबतही तपास होण्याची शक्यता आहे.

फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी अवघ्या १० हजार रुपयांच्या लाचेच्या मागणीपासून सुरू झालेल्या या प्रकरणात आता संबंधित अधिकाऱ्याच्या आर्थिक व्यवहारांचाही तपास होणार असल्याने या चौकशीत आणखी काय समोर येते, याकडे महसूल विभागासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या कारवाईमुळे महसूल विभागातील कामकाजाबाबतही प्रश्न उपस्थित झाले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या महसूलविषयक कामांसाठी लाचेची मागणी केली जाते का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. एसीबीच्या पुढील तपासातून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि अन्य बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *