खेड : फुरुस-आमशेतमध्ये घराची कौले काढून चोरी

banner 468x60

खेड तालुक्यातील फुरुस-आमशेत येथे अज्ञात चोरट्याने घराच्या छतावरील कौले काढून घरात प्रवेश करत तब्बल ४१ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. ही चोरी २ सप्टेंबर रोजी रात्री ८.१५ वाजल्यापासून ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली.

याप्रकरणी फैज परकार (वय ६३, रा. फुरुस-आमशेत, ता. खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी घरात नसल्याची संधी साधून चोरट्याने घराच्या छतावरील कौले काढली आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्याची उचकापाचक करून बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडला. कपाटातील ३७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

तसेच हॉलमध्ये ठेवलेल्या दोन दानपेट्याही फोडून त्यातील अंदाजे ४ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. अशा प्रकारे चोरट्याने एकूण ४१ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

या प्रकरणी ३ सप्टेंबर रोजी रात्री ७.४२ वाजता खेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०४(२), ३(५) तसेच संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *