Breaking News
रत्नागिरी : नाचणे येथे रिक्षाची दुचाकीला पाठीमागून धडक, तरुणी गंभीर जखमी, पत्नीसह रिक्षाचालकही जखमी रत्नागिरी : ‘आपले सरकार’ सेवेत रत्नागिरी पोलीस दलाचा राज्यात सलग दोन महिने प्रथम क्रमांक, ऑनलाइन नागरिक सेवा पुरविण्यात उत्कृष्ट कामगिरी, 3,500 हून अधिक अर्जांचा केला निपटारा रत्नागिरी : न्यायालयाने सील केलेल्या घराचा सील तोडून प्रवेश, रत्नागिरीत एकाविरुद्ध गुन्हा रत्नागिरी : मुल होण्यासाठी ‘विधी’च्या बहाण्याने 1.44 लाखांचे दागिने लंपास, रत्नागिरीत दोन महिलांविरुद्ध गुन्हा चिपळूण : बिल वादावर अपरांत हॉस्पिटलचे स्पष्टीकरण, ‘रुग्णाचा जीव वाचवणे हेच आमचे पहिलं कर्तव्य’ – अपरांत हॉस्पिटल

चिपळूण : बिल वादावर अपरांत हॉस्पिटलचे स्पष्टीकरण, ‘रुग्णाचा जीव वाचवणे हेच आमचे पहिलं कर्तव्य’ – अपरांत हॉस्पिटल

banner 468x60

चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये एका हृदयविकाराच्या रुग्णाच्या उपचारानंतर आकारण्यात आलेल्या बिलावरून निर्माण झालेल्या वादानंतर रुग्णालय प्रशासनाने सविस्तर स्पष्टीकरण देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रुग्णाच्या जीवाला तातडीचा धोका असल्यामुळे कोणताही विलंब न करता उपचार करण्यात आले असून, रुग्णाचा जीव वाचवणे हेच डॉक्टरांचे पहिले कर्तव्य असल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे.

banner 728x90

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय वृद्ध रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आल्याने अत्यंत गंभीर अवस्थेत अपरांत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. अशा परिस्थितीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने डॉक्टरांनी नातेवाईकांच्या संमतीने तातडीने उपचार सुरू केले. हार्ट अटॅकनंतर रक्ताच्या गुठळ्या विरघळविण्यासाठी वापरले जाणारे Abbott कंपनीचे Inj. TENECTELEX 40 हे अत्यंत महत्त्वाचे इंजेक्शन रुग्णाला देण्यात आले. एका इंजेक्शनची किंमत ₹५३,८२९.९२ इतकी असून रुग्णाच्या प्रकृतीनुसार अशी दोन इंजेक्शन्स द्यावी लागल्याने केवळ या औषधावरच सुमारे ₹१,०७,८५९.८४ इतका खर्च झाला, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

यानंतर रुग्णावर सुमारे ३६ तास अतिदक्षता विभागात (ICU) उपचार करण्यात आले. विविध तपासण्या, औषधे, आयसीयू सेवा आणि उपचार यांचा एकूण खर्च मिळून बिल सुमारे ₹१.४७ लाख झाले. मात्र, या एकूण बिलामध्ये हॉस्पिटलचे प्रत्यक्ष सेवा शुल्क केवळ ₹२० ते ₹२२ हजार इतकेच असून, उर्वरित रक्कम महागडी औषधे आणि उपचारासाठी लागलेल्या साहित्याची असल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.

रुग्णालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, गंभीर अवस्थेतील रुग्ण दाखल झाल्यानंतर डॉक्टरांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे वेळेशी स्पर्धा असते. अशा वेळी घरातील निर्णय घेणारी व्यक्ती उपस्थित असेलच असे नाही. त्यामुळे खर्चाची सविस्तर चर्चा करण्यात वेळ घालविण्यापेक्षा रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी तातडीने उपचार सुरू करणे आवश्यक असते. याच भूमिकेतून डॉक्टरांनी उपचार सुरू केले.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयाने उपचार सुरू करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे डिपॉझिट किंवा आगाऊ रक्कम मागितली नव्हती. तसेच उपचार पूर्ण झाल्यानंतरही कोणतीही रक्कम जमा करून न घेता रुग्णाची प्रकृती स्थिर केल्यानंतर त्याला पुढील अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसाठी डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्ण दाखल होतानाचा आणि उपचारानंतरचा ईसीजी अहवालही प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दर्शवत असल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे.

बिलाबाबत निर्माण झालेल्या वादामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची झाल्याची भावना व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. भविष्यात अशा गंभीर रुग्णांवर उपचार करताना प्रथम जीव वाचवायचा की आधी उपचारांचा खर्च सांगून नातेवाईकांच्या निर्णयाची प्रतीक्षा करायची, असा गंभीर प्रश्न आता वैद्यकीय क्षेत्रासमोर उभा राहिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

रुग्णालयाने असेही स्पष्ट केले की, उपचारांबाबत कोणतीही निष्काळजीपणा झाला नाही. रुग्णाला विलंब न लावता उपचार देण्यात आले, डिपॉझिटची अट घालण्यात आली नाही आणि रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतरच पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. तसेच हॉस्पिटलच्या सेवा शुल्कात आवश्यक ती सवलत देण्याची तयारी व्यवस्थापनाची होती आणि आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णांच्या नातेवाईकांशी प्रभावी संवाद, उपचारांचा खर्च आणि आपत्कालीन परिस्थितीतील निर्णयप्रक्रिया या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, या वादावर संबंधित पक्षांची भूमिका समोर आल्यानंतर पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *