चिपळूण : सावर्डेचे मंडळ अधिकारी अनिल जाधव पाच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात, महसूल विभागात खळबळ

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील मंडळ अधिकारी अनिल जाधव याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास रंगेहात पकडले. सावर्डे तलाठी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली असून या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. जाधव याच्याविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून एसीबीकडून अधिक तपास केला जात आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदीखताची नोंद करण्याचे काम गेल्या तब्बल दोन वर्षांपासून प्रलंबित ठेवण्यात आले होते. संबंधित नोंद मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराने अनेक वेळा महसूल कार्यालयात पाठपुरावा केला. मात्र, वारंवार हेलपाटे मारूनही काम होत नसल्याने तक्रारदाराला मोठा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला.

अखेर ही नोंद करून देण्यासाठी मंडळ अधिकारी अनिल जाधव यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाच मागितल्याची बाब निष्पन्न झाल्यानंतर बुधवारी सापळा रचण्यात आला.

पूर्वनियोजित कारवाईनुसार सावर्डे तलाठी कार्यालयात तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने अनिल जाधव याला रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईनंतर कार्यालय परिसरात मोठी खळबळ उडाली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक पुरावे जप्त केले असून संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, अनिल जाधव याच्याविषयी काही दिवसांपूर्वीच विभागप्रमुख प्रणय चव्हाण यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे तक्रार केली होती. सर्वसामान्य नागरिकांकडून आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून पिळवणूक केली जात असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या आरोपांबाबत अधिकृत तपास आणि निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत.

या कारवाईमुळे महसूल विभागातील कामकाजाच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांची कामे महिनोनमहिने प्रलंबित ठेवून पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर येत होत्या. या घटनेमुळे अशा तक्रारींना पुन्हा एकदा बळ मिळाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले असून अशा प्रकरणांमध्ये तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *