चिपळूण : सावर्डे एसबीआय एटीएममध्ये ज्येष्ठ नागरिकाची हातचलाखीने फसवणूक; खात्यातून 20,700 रुपये लंपास

banner 468x60

चिपळूण : सावर्डे येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची हातचलाखीने फसवणूक करून त्यांच्या खात्यातून २० हजार ७०० रुपये काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिताराम तकाराम लांबे (वय ७२, रा. कोसबी मंढे, लांबेवाडी, ता. चिपळूण) हे १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान सावर्डे येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते.

यावेळी एटीएममध्ये उपस्थित असलेल्या एका अनोळखी इसमाने “मी पैसे काढून देतो,” असे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले. त्याने चतुराईने कार्डचा पासवर्डही पाहून घेतला. त्यानंतर हातचलाखी करत फिर्यादींचे मूळ एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवले आणि त्याऐवजी दुसरे एटीएम कार्ड त्यांच्या हातात दिले.

फिर्यादी तेथून निघून गेल्यानंतर आरोपीने त्यांच्या मूळ एटीएम कार्डचा वापर करून खात्यातून एकूण २० हजार ७०० रुपये काढून त्यांची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८१/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.

नागरिकांसाठी आवाहन : एटीएममध्ये अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका. एटीएम कार्ड, पिन किंवा पासवर्ड कोणालाही सांगू अथवा दाखवू नका. संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित संबंधित बँक किंवा पोलिसांशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *