दापोली तालुक्यातील साखळोली गणेशवाडी येथील एका 30 वर्षीय तरुणाचा गवत मारण्यासाठी वापरण्यात येणारे विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद सुरेश भुवड (वय ३०, रा. साखळोली गणेशवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गवत मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, दापोली येथे उपचारासाठी दाखल केले.
प्राथमिक उपचारांनंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने १२ जुलै रोजी सकाळी सुमारे ६ वाजता रुग्णवाहिकेद्वारे त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.५५ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मयताचे मेहुणे लहू रामचंद्र कदम यांनी दापोली पोलिसांना दिली. त्यानुसार १७ जुलै २०२६ रोजी दुपारी २.२९ वाजता दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ५३/२०२६ बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
या मृत्यूमागील नेमके कारण काय होते, याबाबत अधिक तपास सुरू असून, पोलीस सर्व बाबींची पडताळणी करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे साखळोली गणेशवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













