Breaking News

गुहागर : मे महिन्यापासून बेपत्ता असलेल्या प्रमोद कांबळे यांचा माळरानावर हाडांचा सांगाडा, तालुक्यात खळबळ

banner 468x60

गुहागर तालुक्यातील मुंढर-ओवळणवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. मे महिन्यापासून बेपत्ता असलेले प्रमोद धोंडू कांबळे (वय ४५) यांचा हाडांचा सांगाडा माळरानावर आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अनेक महिन्यांपासून त्यांचा शोध सुरू असताना अखेर त्यांचा अशा दुर्दैवी अवस्थेत शोध लागल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद कांबळे हे मे महिन्यापासून बेपत्ता होते. ते अचानक घरातून निघून गेल्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क होत नव्हता. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध ठिकाणी चौकशी करूनही त्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनीही विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली होती, मात्र त्यातून कोणतीही ठोस माहिती मिळाली नव्हती.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी ओवळणवाडी परिसरातील माळरानावर अळंबी शोधण्यासाठी गेलेल्या एका ग्रामस्थाला मानवी हाडांचा सांगाडा दिसून आला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ गुहागर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची पाहणी करून पंचनामा केला.

घटनास्थळी आढळलेल्या कपड्यांच्या आधारे मृताची प्राथमिक ओळख प्रमोद धोंडू कांबळे अशी पटली. पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पाठवला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, प्रमोद कांबळे यांना फिट्सचा (अपस्माराचा) त्रास होता. त्यामुळे माळरानावर असताना त्यांना अचानक झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तथापि, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा अशा अवस्थेत शोध लागल्याने नागरिकांमध्येही दुःखाचे वातावरण आहे. गुहागर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *