साखळोली (प्रतिनिधी : सागर गोवळे): गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या स्थानिक माहितीचे संकलन करत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषी संगिनी’ विद्यार्थिनींनी साखळोली नं. २ येथे एक स्तुत्य उपक्रम राबविला. ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत सहभागी ग्रामीण मूल्यांकन (PRA) प्रक्रियेद्वारे ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून गावाचा सामाजिक व संसाधन नकाशा तयार करण्यात आला.
गावाच्या विकासाचे नियोजन करताना परिसराची अचूक माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे असते. ही बाब लक्षात घेऊन कृषी संगिनींनी ग्रामस्थांशी संवाद साधत प्रत्यक्ष गावात जाऊन माहिती संकलनाचे काम केले. या प्रक्रियेदरम्यान गावातील भौगोलिक रचना, उपलब्ध संसाधने आणि विकासाच्या गरजा यांचा अभ्यास करण्यात आला.
तयार करण्यात आलेल्या नकाशामध्ये गावातील प्रमुख रस्ते, घरांची रचना, शाळा, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, पाण्याचे स्रोत, शेती क्षेत्राचे वितरण तसेच इतर महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून गावाची सद्यस्थिती आणि उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती एकत्रित करण्यात आली.
या उपक्रमासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ग्रामस्थांनी आपल्या अनुभवातून आणि स्थानिक माहितीच्या आधारे दिलेल्या योगदानामुळे गावाची सामाजिक, भौगोलिक आणि कृषीविषयक स्थिती समजून घेणे अधिक सुलभ झाले.
यावेळी कृषी संगिनींनी सांगितले की, तयार करण्यात आलेला हा नकाशा केवळ एक कागदी दस्तऐवज नसून भविष्यातील ग्रामविकास नियोजनासाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे. कृषी विस्तार कार्य, शेतकरी मार्गदर्शन तसेच विविध शासकीय विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या नकाशाचा उपयोग होऊ शकणार आहे.
कृषी संगिनी विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. विद्यार्थिनींनी गावाच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद असून, या माध्यमातून ग्रामविकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













