लांजा : तालुक्यातील तायक्वांदोपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी, चार सुवर्ण, तीन कांस्य पदकांची कमाई

banner 468x60

देवरुख येथे आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्योरुगी व पुमसे स्पर्धेत लांजा तालुक्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत चार सुवर्ण आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली. या यशामुळे लांजा तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

banner 728x90

संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी आणि नगर पंचायत देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत १० ते १२ जुलै २०२६ या कालावधीत देवरुख येथे या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येने खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत लांजा तालुक्यातील खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट तंत्रकौशल्याचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. स्वर्णीम श्रेयस शेट्ये, योगेश ईश्वर तोंडारे, भक्ती भागवत कुंभार आणि तेजस्वी दशरथ लाड यांनी आपापल्या गटात सर्वोत्तम खेळ करत सुवर्णपदक पटकावले.

तर अमायरा मोहसीन अपराध, माऊली तुषार चव्हाण आणि वृत्ती रंजन पावसकर यांनी प्रभावी कामगिरी करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. पदक विजेत्यांसह युगा प्रसाद डोर्ले, अन्वी सचिन पवार, आदी रंजन पावसकर, दीपराज युवराज खानविलकर, तनया संदीप पाटकर, आर्या सचिन पवार, सात्विक श्रेयस साळुंखे, रीया प्रमोद लांजेकर, आराध्य कमलाकर सावंत आणि आदिश्री अभय शेट्ये यांनीही स्पर्धेत सहभागी होत उल्लेखनीय खेळाचे प्रदर्शन केले.

या स्पर्धेत लांजा अकॅडमीच्या सचिव तसेच राष्ट्रीय पंच तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडत स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

सर्व खेळाडूंना लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, प्रमुख प्रशिक्षिका शितल विरेंद्र आचरेकर तसेच सहप्रशिक्षक गौरव दीपक खेडेकर आणि गणेश ईश्वर तोंडारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या उल्लेखनीय यशाबद्दल तायक्वांदो फिटनेस अकॅडमी लांजा आणि गुरुकुल अकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडिज, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे, लक्ष्मण कर्रा तसेच मार्गदर्शक तेजस वडवळकर यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे खजिनदार आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश कर्रा, सचिव लक्ष्मण कर्रा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे आणि कोषाध्यक्ष शशांक घडशी यांनीही खेळाडूंच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *