संगमेश्वर : देवरुख येथील जनावरांची अमानुष वाहतूक करणारी तीन वाहने जप्त, पाच जणांवर गुन्हे

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यात जनावरांची अमानुष आणि नियमबाह्य पद्धतीने वाहतूक करणाऱ्यांविरोधात देवरुख पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. देवरुख पोलीस आणि साखरपा पोलीस दूरक्षेत्राच्या संयुक्त विशेष मोहिमेत तीन महिंद्रा बोलेरो पिकअप वाहने अडवून तपासणी करण्यात आली. या कारवाईत बैल आणि म्हशींना अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

१३ आणि १४ जुलै रोजी साखरपा तळवाडी आणि सह्याद्रीनगर तिठा परिसरात पोलिसांनी संशयास्पद वाहनांची तपासणी केली. यावेळी जनावरांना मानेला आखूड दोरीने बांधून हालचाल करता येणार नाही अशा अवस्थेत दाटीवाटीने कोंबण्यात आले होते. वाहनांमध्ये हवा खेळती राहण्याची व्यवस्था नव्हती, जनावरांच्या खाण्यापिण्याची कोणतीही सोय नव्हती, तर सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले पार्टीशनही नव्हते.

तपासणीदरम्यान वाहनांमध्ये प्रथमोपचार पेटी नसणे, जनावरे वाहतुकीचे प्रमाणपत्र नसणे, वाहनांवर आवश्यक फलक न लावणे अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. एका वाहनामध्ये जखमी अवस्थेतील म्हशीची वाहतूक होत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. काही चालकांकडे वैध वाहन परवानाही नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून नितीन गंगाराम चव्हाण, रोहन अंकुश साळुंखे, गणेश गणपत लांबोरे, संतोष राजाराम गजचार आणि संतोष सखाराम जांगली यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे.

ही धडक कारवाई देवरुख पोलीस ठाण्याचे संजय करांडे, मनस्वी पावसकर, गणेश सुतार आणि त्यांच्या पथकाने केली. जनावरांची बेकायदेशीर व अमानुष वाहतूक करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, या कारवाईमुळे जनावरांची तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *