रत्नागिरी जिल्ह्यातिलक हातखंबा ते निवळी मार्गावरील भोके आंबेकरवाडी फाटा येथे झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना दि. ११ जुलै रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
मृत व्यक्तीचे नाव गुरुनाथ कृष्णा कळंगुटकर (वय ७३, रा. भोके आंबेकरवाडी, रत्नागिरी) असे आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोटारसायकल चालक अरझान मुस्ताक काझी (वय ३३, रा. कळंबस्ते, ता. संगमेश्वर) याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ जुलै रोजी सायंकाळी गुरुनाथ कळंगुटकर हे आपल्या ॲक्टिव्हा स्कूटर (एमएच ०८ टी ०४३७) वरून भोके येथून खेडशीच्या दिशेने जात होते. यावेळी भोके आंबेकरवाडी फाटा येथे ते रस्ता ओलांडत असताना हातखंबा तिठा ते निवळीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने (एमएच ०८ एएच ९५५४) त्यांच्या ॲक्टिव्हाला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, गुरुनाथ कळंगुटकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात मोटारसायकल चालक अरझान काझी तसेच त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी हे दोघेही जखमी झाले आहेत.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रघुनाथ भिसे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी चालक अरझान काझी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













