मंडणगड तालुक्यातील गांधी चौक येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची संरक्षक भिंत दुसऱ्यांदा कोसळल्याची धक्कादायक घटना ८ जुलै २०२६ रोजी दुपारी शाळा सुटल्यानंतर घडली. सुदैवाने ही घटना विद्यार्थी शाळेबाहेर पडल्यानंतर घडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिंतीला तडे गेले होते. अखेर बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर संरक्षक भिंतीचा मोठा भाग कोसळला. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे ही घटना शाळा सुरू असताना घडली असती, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या ठिकाणी यापूर्वीही संरक्षक भिंत कोसळली होती. त्यानंतर नगरपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळा कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, चिरेबंदी स्वरूपाची भिंत उभारण्यात आली. ही भिंत पुन्हा कोसळल्याने अशा प्रकारच्या तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी मजबूत आरसीसी (काँक्रीट) संरक्षक भिंत उभारण्याची गरज असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
घटनेची माहिती मिळताच नगरपंचायतीचे अधिकारी आणि उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी शाळा प्रशासन आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा करून नुकसानाचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संरक्षक भिंतीचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, पालक आणि नागरिकांनी प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने मजबूत काँक्रीटची संरक्षक भिंत उभारावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक अभियांत्रिकी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













