सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड किल्ला परिसरात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. किल्ल्याच्या महादरवाजा परिसरात मोठ्या प्रमाणात दगड व माती पायरी मार्गावर आल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग २४ आणि २५ जून या दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून मार्ग पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी आणि यंत्रसामग्रीच्या मदतीने काम सुरू आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आणखी दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पर्यटकांना पायरी मार्गाने प्रवेश देणे सध्या धोकादायक ठरत आहे.

महाड प्रशासनाने पर्यटक, ट्रेकर्स आणि स्थानिक नागरिकांना या कालावधीत पायरी मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून बंदी असतानाही मार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना किसन जावळे यांनी सांगितले की, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. दरड हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि मार्ग सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच पायरी मार्ग पुन्हा सुरू करण्यात येईल.
दरम्यान, पावसाळी हंगामात रायगड किल्ल्यावर मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांनी सहकार्य करावे आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













