गुहागर : तालुक्यात आपत्तींची मालिका; झाडे कोसळून घरांचे नुकसान

banner 468x60

गुहागर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी आपत्तीजनक घटना घडत असून नागरिकांचे नुकसान होत आहे. विशेषतः २३ जून रोजी दिवसभरात झाडे कोसळणे, भिंती पडणे आणि घरांचे नुकसान होण्याच्या अनेक घटना नोंदविण्यात आल्या.

banner 728x90

मौजे पाचेरीसडा येथील पानबुडी फाटा-मधलीवाडी मार्गावर वादळी वाऱ्यामुळे काजूच्या झाडाची मोठी फांदी रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

ग्रामपंचायत वेलदूर हद्दीतील नवानगर येथे प्रमोद वणकर यांच्या घराची भिंत व शौचालय पावसामुळे कोसळून नुकसान झाले. तसेच छाया दाभोळकर यांच्या घरासमोरील संरक्षण भिंतही कोसळली. नरवण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रोहिले महसूल गावात प्रसाद पिलणकर यांच्या घरावर माडाचे झाड पडल्याने नुकसान झाले. याच गावातील चंद्रकांत यशवंत पिलणकर यांच्या घरावर नारळाचे झाड कोसळून घराचे अंशतः नुकसान झाले आहे.

दरम्यान, चिखली कदमवाडी येथील अशोक पुंडलिक गोयथळे यांच्या घराजवळील सुपारीचे झाड कोसळल्याने घरावरील सिमेंट पत्रे फुटून नुकसान झाले. तसेच २२ जून रोजी जांभारी येथील जितेंद्र आग्रे यांच्या विहिरीचे अंशतः नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

घडलेल्या सर्व घटनांचे पंचनामे करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तालुक्यातील संपूर्ण परिस्थितीवर महसूल व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा लक्ष ठेवून आहे.

त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणे टाळावे, तसेच वादळी वाऱ्याच्या व मुसळधार पावसाच्या काळात विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *