दापोली : मुसळधार पाऊस चंद्रनगरमध्ये पहिल्याच पावसात हॉटेल पायसदानची कंपाउंड भिंत कोसळली

banner 468x60

दापोली तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका चंद्रनगर परिसराला बसला असून, येथील हॉटेल पायसदानची सुमारे ६० फूट लांबीची पक्की चिरेबांधणी असलेली कंपाउंड वॉल सोमवारी (२३ जून) सकाळी कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हॉटेलचे मालक रमेश भुवड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपाउंड वॉल रस्त्यालगत उभी होती. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्याच्या वाढलेल्या दाबामुळे भिंत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रनगर मुख्य रस्त्यालगत ही भिंत कोसळल्याने वाहतुकीस काही प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी रमेश भुवड यांनी रस्त्याच्या कडेला चिरे व इशारा देणारी व्यवस्था करून ठेवली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती चंद्रनगरचे प्रशासक सकपाळ यांना देण्यात आल्याचेही भुवड यांनी सांगितले. पहिल्याच जोरदार पावसात झालेल्या या घटनेमुळे परिसरातील इतर बांधकामांच्या सुरक्षिततेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *