दापोली : जि.प. शाळा गव्हे येथे विद्यार्थ्यांना सायकल वितरण; सलग तिसऱ्या वर्षी समाजोपयोगी उपक्रम

banner 468x60

जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, गव्हे येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. हायस्कूलला जाण्या-येण्यासाठी विद्यार्थ्यांना होणारी गैरसोय दूर व्हावी आणि अंतराच्या अडचणीमुळे शिक्षणात खंड पडू नये, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला.

banner 728x90

माजी विद्यार्थी केशव करमरकर यांच्या उदार दातृत्वातून आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय रमेश गुरव यांच्या विशेष प्रयत्नांतून हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी राबविण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. या सायकलींमुळे विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नियमिततेलाही चालना मिळणार आहे.

स्वतः या शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या केशव करमरकर यांनी आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम सुरू ठेवला आहे. तर संजय रमेश गुरव यांनी गावातील कोणताही विद्यार्थी वाहतुकीच्या अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, या हेतूने उपक्रम यशस्वी करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला.

या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत दाते आणि आयोजकांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी अशा समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा पुढेही कायम राहावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *