चिपळूण येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेरशेत येथे मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात मरून रंगाच्या आयशर कंटेनरने प्रथम उभ्या रिक्षाला आणि त्यानंतर रिक्षाजवळ उभ्या असलेल्या तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून अपघातानंतर चालक कंटेनरसह घटनास्थळावरून फरार झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १७ जून रोजी मध्यरात्री १२.२८ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेरशेत येथील न्यू वृंदावन हॉटेलसमोर घडली. आरवली (ता. संगमेश्वर) येथील रहिवासी आर्यन सुदेश पवार (वय २१) हा आपल्या रिक्षाजवळ (एमएच-०८ एल-९६३८) रस्त्याच्या कडेला उभा होता.
त्याचवेळी मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणारा मरून रंगाचा आयशर कंटेनर घटनास्थळी आला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यानंतर रिक्षाजवळ उभ्या असलेल्या आर्यन पवार यालाही कंटेनरने चिरडले. धडक इतकी भीषण होती की आर्यनचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आर्यनला वाचविण्याची कोणतीही संधी उरली नव्हती.
विशेष म्हणजे अपघातानंतर कंटेनर चालकाने थांबून मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणी तेजस रामचंद्र शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण (सावर्डे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात कंटेनर चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि १३४ (अ), (ब) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अपघातामुळे आरवली परिसरात शोककळा पसरली असून आर्यन पवारच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, फरार चालकाला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













