देवरुख-रत्नागिरी मार्गावरील निवे बुद्रुक येथे सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातात एका नमन कलाकाराचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सायले येथील नमनाचा कार्यक्रम आटोपून परतत असताना कलाकारांच्या वॅगनआर कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक बसल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सायले परिसरात नमनाचा कार्यक्रम सादर करून कलाकारांचा गट पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर कारमधून (MH 02 JP 9493) निवळीच्या दिशेने निघाला होता. सोमवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास कार निवे बुद्रुक परिसरात पोहोचली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर भरधाव वेगातील कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरवर (MH 08 G 1559) पाठीमागून जाऊन आदळली.

धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. वाहनाचा दर्शनी भाग डंपरमध्ये घुसल्याने कारमधील प्रवासी गंभीररीत्या अडकून पडले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ सचिन विभुते, राजू ताम्हणकर, उमेश ताम्हणकर आणि संतोष सांडिम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कोणतीही पर्वा न करता मदतकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या तसेच डंपरखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी अथक प्रयत्न केले. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे जखमींना त्वरित मदत मिळू शकली.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच ‘भगवान महादेव सांबरे रुग्णवाहिका’ सेवेचे चालक मनोज पांचाळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एका नमन कलाकाराला मृत घोषित केले, तर इतर चार जणांवर उपचार सुरू करण्यात आले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या अपघातात मृत्यू झालेल्या कलाकाराची ओळख वृत्त लिहिपर्यंत पटलेली नव्हती. त्यामुळे नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहनांची पाहणी केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे नमन कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. कार्यक्रम संपवून घरी परतत असताना घडलेल्या या अपघातामुळे कलाकारांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, देवरुख पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
स्थानिक नागरिकांनी मात्र रस्त्याच्या कडेला उभी केली जाणारी अवजड वाहने ही अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. अशा वाहनांवर नियंत्रण ठेवून महामार्ग व प्रमुख मार्गांवर सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची मागणीही यानिमित्ताने करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













