खेड : भरधाव डंपरची रिक्षाला धडक; एकाचा जागीच मृत्यू, रिक्षाचालक गंभीर जखमी

banner 468x60

खेड तालुक्यातील भरणे-खेड मार्गावरील आठवडा बाजार परिसरात शनिवारी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, भिलारे आयणी येथील संतोष भिलारे हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा (एमएच 08 एक्यू 8784) घेऊन भरणे येथून खेडकडे जात होते. रिक्षा आठवडा बाजार परिसरात पोहोचताच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की रिक्षाचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

या अपघातात रिक्षाचालक संतोष भिलारे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मात्र मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून ती व्यक्ती रिक्षामध्ये प्रवास करत होती की रिक्षात बसण्यासाठी हात दाखवत असताना अपघाताची शिकार झाली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी रिक्षाचालकाला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच 108 रुग्णवाहिका सेवा आणि खेड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य व पंचनामा केला.

या भीषण अपघाताचा पुढील तपास खेड पोलीस करत असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *