संगमेश्वर : गुटखा तस्करीचा पर्दाफाश, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा बेत वाहनाच्या तांत्रिक बिघाडामुळे उधळला गेला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पारेख पेट्रोलपंपासमोर संशयास्पद अवस्थेत उभी असलेल्या कारमधून संगमेश्वर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या कारवाईत गुटखा, तंबाखू आणि वाहनासह एकूण ५ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २६ मे) रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पारेख पेट्रोलपंपासमोर रस्त्याच्या कडेला एक संशयित कार उभी असल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांना मिळाली. या वाहनात प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

शोधमोहीमेदरम्यान एमएच-१४ बीके-४१२० क्रमांकाची कार लॉक केलेल्या अवस्थेत आढळून आली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा असल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक तपासात हा माल विक्रीसाठी इतरत्र नेण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, वाहनात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पलायन केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर संगमेश्वर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधला. बुधवारी सायंकाळी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत वाहनातील मालाची तपासणी आणि पंचनामा करण्यात आला.

तपासणीत वाहनातून केशरयुक्त विमल पानमसाला, विमल-१ तंबाखू, प्रीमियम आरएमडी पानमसाला आणि एम. सेंटेड टोबॅको गोल्ड या प्रतिबंधित उत्पादनांचा साठा आढळून आला. या मालाची किंमत २ लाख ४६ हजार ६०० रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे ३ लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ४६ हजार ६०० रुपये इतकी आहे.

राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर बंदी असतानाही विविध मार्गांनी या पदार्थांची तस्करी केली जात असल्याचे प्रकार अधूनमधून उघडकीस येत असतात. संगमेश्वर पोलिसांच्या या कारवाईमुळे अशाच एका अवैध साखळीचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कृणाल घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच भारतीय दंड विधानातील कलम १८८, २७२, २७३, ३२८ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करीत असून, वाहनाचा मालक, माल पाठवणारे आणि स्वीकारणारे यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा तस्करीवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *