दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यात वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवीन विद्युत उपकेंद्रे उभारण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. वाढत्या वीजभारामुळे या भागातील वीज वितरण व्यवस्था ताणली जात असून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.
यासंदर्भात राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत दापोली तालुक्यातील टाळसुरे येथे नवीन २२०/३३ के.व्ही. क्षमतेचे अति उच्चदाब विद्युत उपकेंद्र उभारण्याची मागणी केली आहे. सन २०२६-२७ ते २०३५-३६ या एसटीयू योजनेअंतर्गत हे उपकेंद्र प्रस्तावित असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या भागातील वाढती निवासी व औद्योगिक विजेची मागणी लक्षात घेता सध्याची विद्युत यंत्रणा अपुरी पडत असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाचा पुरवठा आणि तांत्रिक बिघाड यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरातील वीजप्रवाह सुरळीत आणि सक्षम करण्यासाठी आणखी पाच नवीन ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रांची गरज असल्याचे योगेश कदम यांनी म्हटले आहे.
प्रस्तावित उपकेंद्रांमध्ये दापोली तालुक्यातील वळणे एमआयडीसी आणि आसूद येथील उपकेंद्रांचा समावेश आहे. तसेच खेड तालुक्यातील नातूनगर, फुरूस आणि शिवतर येथेही नवीन विद्युत उपकेंद्रे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
या पाच उपकेंद्रांसाठी एकूण ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा तसेच त्यांना तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या उपकेंद्रांची उभारणी झाल्यास दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिक, उद्योग, पर्यटन व्यवसाय आणि एमआयडीसी परिसरालाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, दापोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नवीन विद्युत उपकेंद्रांची मागणी पुढे आल्याने या भागातील वीज समस्यांवर भविष्यात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













