रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथे मोबाईलचा अचानक स्फोट होऊन एक तरुण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावरील फेसबुक रिल पाहत घरी जात असताना हा प्रकार घडला. जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी तरुणाचे नाव सुशिल सुनिल रहाटे (वय ३५) असे आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिनोलेक्स फाटा ते कोळंबे गाव रस्त्यावर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशिल रहाटे यांचे फिनोलेक्स फाटा येथे गॅरेज असून रात्री काम आटोपल्यानंतर ते पायी आपल्या गावी जात होते. चालत असताना ते मोबाईलवर फेसबुक रिल पाहत होते. त्याचवेळी अचानक मोबाईलचा जोरदार स्फोट झाला.
स्फोटामुळे त्यांच्या हातातील मोबाईल खाली पडला. या घटनेत त्यांच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली असून स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मोबाईल स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी बॅटरीमध्ये बिघाड किंवा अतिउष्णतेमुळे हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मोबाईल वापराबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













