दापोलीतील हरवलेला 12 वर्षीय अलोक मोरे सुखरूप सापडला

banner 468x60

दापोली तालुक्यातील हरवलेला १२ वर्षीय मुलगा अलोक मोरे सुखरूप सापडल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालगाव (ता. दापोली) येथील अलोक मोरे हा मुलगा १६ मे रोजी सकाळी घरातून बाहेर पडला होता. मात्र बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी चिंताग्रस्त होऊन दापोली पोलीस स्थानक येथे हरवल्याची तक्रार नोंदवली होती.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून मुलाचा शोध सुरू करण्यात आला होता. अखेर आज दापोली तालुक्यातील बुरोंडी परिसरात अलोक मोरे आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला सुरक्षितपणे दापोली पोलीस स्थानकात आणल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

दरम्यान, या मुलाला कोणत्याही व्यक्तीने फूस लावून नेलेले किंवा पळवून नेल्याचा प्रकार नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

घरातील काही संभ्रम किंवा मानसिक तणावामुळे अलोक घरातून निघून गेला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून मुलाची समुपदेशनाद्वारे विचारपूस केली जाणार असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *