खावडकरवाडी परिसरात भाड्याने राहणाऱ्या एका ३५ वर्षीय विवाहितेचा झोपेत असतानाच अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौ. जान्हवी महेश देवरुखकर असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
जान्हवी देवरुखकर या मूळच्या राजापूर तालुक्यातील वडदहसोळ मिरजोळकरवाडी येथील रहिवासी होत्या. त्या पती महेश देवरुखकर यांच्यासह लांजा येथील खावडकरवाडीमध्ये प्रकाश जोशी यांच्या घरात भाड्याने राहत होत्या. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे दाम्पत्य लांजा येथे वास्तव्यास होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दिनांक ९ मे २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास जान्हवी या घरात झोपलेल्या असताना अचानक त्यांच्या शरीराला थरथर सुरू झाली. झोपेतच त्यांच्या हालचाली वाढल्याने पती महेश देवरुखकर यांना संशय आला. त्यांनी तातडीने उठून घरातील दिवे लावले असता जान्हवी यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. तसेच त्यांचे हातपाय थंड पडल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आले.
पत्नीची अवस्था पाहून घाबरलेल्या महेश देवरुखकर यांनी तात्काळ मदतीसाठी धावपळ सुरू केली. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून जान्हवी यांना प्रथम खासगी स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये नेले. तेथून अधिक उपचारासाठी त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाणे पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पंचनामा केला. पती महेश देवरुखकर यांनी दिलेल्या माहितीवरून बी.एन.एस.एस. कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अकस्मात मृत्यू क्रमांक २९/२०२६ असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जान्हवी यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













