रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे एका किरकोळ प्रश्नातून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “तुम्ही लग्नाला जाता की दारू प्यायला जाता?” असा उपरोधिक सवाल केल्याच्या रागातून ४९ वर्षीय व्यक्तीने ५५ वर्षीय मच्छीमारावर सुरीने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शौकत मजिद सारंग (वय ५५, रा. गोळप मोहल्ला) हे गुरुवारी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास गोळप येथील मशिदीजवळ उभे होते. त्यावेळी आरोपी शैबाज युसुफ मजगावकर (वय ४९) हा तेथे आला. त्याने शौकत सारंग यांना “तुम्ही लग्नाला जाता की दारू प्यायला जाता?” असा टोमणेखोर प्रश्न विचारला. या वक्तव्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.
“तू मला असे का बोलला?” अशी विचारणा शौकत यांनी केली असता आरोपी अधिक आक्रमक झाला. त्याने शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून शौकत सारंग तेथून निघून थेट आपल्या घरी गेले. मात्र, वाद तिथेच थांबला नाही.
काही वेळानंतर आरोपी शैबाज मजगावकर हा थेट शौकत यांच्या घराजवळ पोहोचला. त्याने पुन्हा मशिदीजवळ येण्यास सांगितले. परिस्थिती समजून घेण्यासाठी शौकत मशिदीजवळ गेले असता आरोपीने अचानक त्यांचा डावा हात पकडला आणि सोबत आणलेल्या धारदार सुरीने त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला तसेच कपाळावर सपासप वार केले.
अचानक झालेल्या या हल्ल्यात शौकत सारंग गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी अवस्थेत शौकत यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे २.४६ वाजता आरोपी शैबाज युसुफ मजगावकर याच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, किरकोळ कारणावरून घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे गोळप परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













