मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी येथील बसस्टॉपच्या मागील बाजूस दोन कारमध्ये झालेल्या अपघातात सात जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद महादेव जाधव (वय ४८, रा. चेंबूर, मुंबई) हे आपल्या कुटुंबीयांसह कारने मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात होते. बुधवारी ते संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी परिसरातील उतारावर आले असता रस्त्याच्या डाव्या बाजूला एक ह्युंडाई आय-१० कार उभी होती. दरम्यान, जाधव यांच्या कारचा वेग नियंत्रणात न राहिल्याने त्यांच्या वाहनाने उभ्या असलेल्या कारला मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या पुढील व मागील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना वाहनाबाहेर काढले.
या अपघातात प्रसाद महादेव जाधव (४८), मानिनी महादेव जाधव (७५), प्रियांका जयसेन जाधव (२७), अदिरा जयसेन जाधव (६), तुषार अशोक लोके (५०), अशोक रामजी लोके (८२) आणि गार्गी तुषार लोके (४५) हे जखमी झाले. सुदैवाने सर्वांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. व्ही. कोष्टी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
या प्रकरणाची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून श्रेणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. साळवी पुढील तपास करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













