राजापूर : बनावट पेमेंट स्क्रीनशॉटने काजू व्यापाऱ्याला 23.99 लाखांचा गंडा

banner 468x60

ऑनलाईन व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत असून, बनावट पेमेंट स्क्रीनशॉटच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. राजापूर येथील काजू व्यापाऱ्याला तब्बल २३ लाख ९९ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर येथील व्यापारी रमेश रामचंद्र वाडकर यांच्याशी भिवंडी येथील पंकज भद्रा याने काजू खरेदीसाठी संपर्क साधला होता. ठरलेल्या व्यवहारानुसार वाडकर यांनी सुमारे ३,१४० किलो काजूचा माल ट्रकद्वारे अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी पाडा येथील गोदामात पाठवला. १५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे हा माल संबंधित ठिकाणी उतरवून घेण्यात आला.

माल सुपूर्द झाल्यानंतर आरोपी पंकज भद्रा याने व्यवहार पूर्ण झाल्याचे भासवण्यासाठी वाडकर यांच्या व्हॉट्सॲपवर Kotak Mahindra Bank चा ट्रान्झॅक्शन स्क्रीनशॉट पाठवला. या स्क्रीनशॉटमध्ये अधिकृत यूटीआर क्रमांक देखील नमूद करण्यात आला होता, त्यामुळे सुरुवातीला व्यवहार खरा असल्याचा भास निर्माण झाला.

मात्र, काही वेळानंतरही वाडकर यांच्या पत्नीच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नाही. यामुळे संशय आल्याने त्यांनी संबंधित बँकेत चौकशी केली असता तो स्क्रीनशॉट पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वाडकर यांनी उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पंकज भद्रा याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेवाड करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

दरम्यान, वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. केवळ स्क्रीनशॉट किंवा मेसेजवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष बँक खात्यात रक्कम जमा झाल्याची खात्री करूनच माल सुपूर्द करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *