रायगड : माणगावमधील सहा पोलिसांचे निलंबन, नक्की काय घडलं पाहा

banner 468x60

रायगड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) माणगावमधील ६ पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. चोरीच्या मुद्देमालाच्या नोंदीत झालेल्या गंभीर विसंगतीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाने एलसीबीच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये उपनिरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह बाबासो पिंगळे, वाघमोडे, सोंडकर, पहलकर आणि आंबले यांचा समावेश आहे. माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद कंपनीतून माल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान काही मुद्देमाल माणगाव पोलिसांनी हस्तगत केला होता.

मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या मुद्देमालाची अधिकृत नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आल्याचे समोर आले. ही विसंगती उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पातळीवर खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तत्काळ कठोर भूमिका घेत संबंधित सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे पोलीस यंत्रणेत शिस्त आणि पारदर्शकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांच्या निलंबनानंतर एलसीबीतील काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. बदलीनंतरही काही कर्मचारी हस्तकांच्या माध्यमातून बेकायदेशीर वसुली करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

तसेच, एका कर्मचाऱ्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याच्या चर्चाही समोर येत आहेत. या सर्व बाबींमुळे या कारवाईमागे केवळ नोंदीतील गोंधळ नसून अधिक खोलवर तपासाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *