रमजान आणि होळी या सणांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सामाजिक सलोखा व शांतता अबाधित राहावी, यासाठी आज मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दापोली पोलीस स्टेशन येथे ‘शांतता समिती’ची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला दोन्ही समाजांतील प्रतिष्ठित नागरिकांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.


तालुक्यात शांतता, सुव्यवस्था आणि विविध समाजांमध्ये आपुलकीचे वातावरण कायम राहावे, या उद्देशाने स्थानिक पोलीस प्रशासनाकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आगामी सणांच्या काळात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता समाजात एकोपा कसा टिकवता येईल, यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे दापोलीतील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. राजकारण बाजूला ठेवून शहर व तालुक्याच्या शांततेसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.


बैठकीत दोन्ही समाजांतील प्रमुखांनी आपली मते मांडली. “दापोलीची परंपरा नेहमीच गुण्यागोविंदाने राहण्याची राहिली आहे आणि ती पुढेही कायम राखली जाईल,” असे आश्वासन दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी दिले. किरकोळ वादांचे पर्यावसान मोठ्या संघर्षात होऊ नये, यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय समिती स्थापन करण्याबाबतही चर्चा झाली.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “सामाजिक सलोखा राखणे ही केवळ पोलिसांचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सोशल मीडियावरील चिथावणीखोर पोस्ट किंवा अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि काही संशयास्पद बाबी आढळल्यास त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा.”
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीमुळे दापोलीतील सामाजिक सलोखा अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















