Breaking News
दापोली : जमीन घोटाळा? 621 गुंठे वक्फ जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करा, चौकशी पूर्ण होईपर्यंत बांधकाम आणि तृतीय पक्षाला हस्तांतरणास स्थगिती देण्याची मागणी, जाकीर शेकासन यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार चिपळूण : कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागातून अॅल्युमिनियम पत्रे, लोखंडी पाईपची चोरी, एकाविरोधात गुन्हा चिपळूण : कळंबस्ते येथे मध्यरात्री संशयास्पद हालचाली; इसम पोलिसांच्या ताब्यात दापोली : दारू पिल्यानंतर बेशुद्ध पडलेल्या 25 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू दापोली : घरात कामाला येणाऱ्या महिलेवर चोरीचा आरोप, 98 हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

खेड : राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; खेड तालुक्यात तणाव

banner 468x60

खेड तालुक्यातील आंबेठाण–पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनीता बुट्टे यांचे पती व माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांच्यावर धामणी (ता. खेड) येथे शुक्रवारी (दि. ६) रात्री अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात शरद बुट्टे-पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वासुली फाटा येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शरद बुट्टे-पाटील हे शुक्रवारी रात्री आपल्या एका मित्रासोबत धामणी येथील एका मित्राकडे जात होते. धामणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकून रस्ता अडविण्यात आला होता. रस्ता कोणी अडविला आहे हे पाहण्यासाठी बुट्टे-पाटील गाडीतून खाली उतरले असता, रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर दगडफेक सुरू केली.


या अचानक झालेल्या हल्ल्यात शरद बुट्टे-पाटील यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासोबत असलेला सहकारीही या हल्ल्यात जखमी झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही तातडीने वासुली फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरद बुट्टे-पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असले, तरी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे.


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवणे यासह हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली आहेत. हा हल्ला जुन्या वादातून झाला की राजकीय कारणातून, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून सर्व शक्यता तपासल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे.


या घटनेनंतर आंबेठाण–पाईट परिसरात तणाव निर्माण झाला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *