चिपळूण : लावणीसाठी लवकर उठण्याच्या वादातून सुनेकडून 71 वर्षीय सासूला मारहाण; चिपळूणमध्ये गुन्हा दाखल

banner 468x60

लावणीच्या कामासाठी लवकर उठण्यास सांगितल्याच्या कारणावरून ७१ वर्षीय सासूला सुनेने मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील रेहेळ गावणवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रेहेळ गावणवाडी येथे घडली. याप्रकरणी सुवर्णा कृष्णा नाचरे (वय ७१, व्यवसाय शेती, रा. रेहेळ, गावणवाडी, ता. चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, त्या घरात असताना त्यांनी मुलगा दर्शन आणि सून मयुरी यांना “लवकर उठा, शेतात लावणी करायचे दिवस आहेत. अजूनही झोपले आहात, अशाने शेतीची कामे कशी होणार?” असे सांगितले. या बोलण्याचा राग मनात धरून सून मयुरी दर्शन नाचरे हिने फिर्यादींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चुलीजवळ ठेवलेल्या लाकडी फाट्याने त्यांच्या डोक्यावर आणि उजव्या हातावर वार करून दुखापत केली. यानंतर शिवीगाळ करत “बघून घेते” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१०/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *