राजापूर तालुक्यातील गोवळ येथील आंबा बागेत रखवालदार म्हणून काम करणाऱ्या नेपाळी व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १ मे रोजी सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव सरजन विर्ख बहादूर शाही (वय ६८ वर्षे) असे असून ते मूळचे नेपाळमधील धनगडी नगरपालिका, घोडागाडी, जिल्हा कैलाली येथील रहिवासी होते. उपजीविकेसाठी ते काही महिन्यांपूर्वी कोकणात आले होते. नोव्हेंबर २०२५ पासून ते गोवळ येथील अबीद अल्ली अ. अजीज काझी यांच्या मालकीच्या करारावर घेतलेल्या आंबा बागेत रखवालदार म्हणून काम पाहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रोजच्या प्रमाणे सकाळी बागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या काही कामगारांना शाही हे झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने स्थानिकांना व मालकांना याची माहिती दिली. त्यानंतर राजापूर पोलीस स्थानकाला कळविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वैयक्तिक कारणे, मानसिक ताणतणाव किंवा इतर कोणतेही कारण याबाबत पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. स्थानिकांकडूनही माहिती घेण्यात येत आहे.
या घटनेमुळे गोवळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, परराज्यातून येऊन मेहनत करून उपजीविका करणाऱ्या व्यक्तीच्या अशा दुर्दैवी अंतामुळे सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













