चिपळूण : मुंबईहून आपल्या बहिणीसोबत कोकणातील गावी येत असताना धावत्या रेल्वेतून अचानक तोल जाऊन खाली पडल्याने एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चिपळूण तालुक्यात घडली. या घटनेमुळे गुरव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मूळ गाव असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कडवई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही दुर्घटना शनिवार, १६ मे रोजी दुपारी १२:४० वाजण्याच्या सुमारास चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते बौद्धवाडी येथील रेल्वे पोल क्रमांक १३०/२० जवळ घडली. ओंकार विजय गुरव (वय १९ वर्षे, रा. कुर्ला कमानी, मुंबई; मूळ रा. कडवई, ता. संगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हा आपल्या बहिणीसोबत मुंबईहून कोकणात राहत्या गावी येण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होता. उन्हाळी सुट्टीमुळे तो आनंदाने गावी निघाला होता. रेल्वे चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते परिसरातून जात असताना तो रेल्वेच्या दरवाज्याजवळ उभा होता. याचदरम्यान अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट धावत्या रेल्वेतून खाली कोसळला.
धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. रेल्वे पोलजवळ जोरात आदळल्यामुळे त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर मार लागला. अपघात इतका भीषण होता की ओंकारचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील प्रक्रिया आणि शवविच्छेदनासाठी हलवला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, ऐन सुट्टीत बहिणीसोबत आनंदाने गावी येत असताना काळाने ओंकारवर घाला घातल्याने गुरव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे कडवई गावासह परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













