दापोलीतील दुचाकी अपघातातील 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईत उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

banner 468x60

दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथे २५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुर्वांक राजेंद्र यादव (वय १७, रा. दापोली) याचा बुधवारी आज , २८ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. मुंबई येथे उपचार सुरू असताना त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. या अपघातात संकेत अमर देवळेकर (वय २४, रा. खेड) तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर डेरवन येथे उपचार सुरू आहेत.

रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी रात्री १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास गिम्हवणे येथील नवीन पेट्रोल पंपासमोरील मारुती मंदिराजवळ हा अपघात घडला. दुर्वांक यादव हा दुचाकी चालवत होता, तर संकेत अमर देवळेकर (वय २४, रा. खेड) हा त्याच्या मागील सीटवर बसला होता. दोघेही मित्र दुर्वांकच्या घरी जेवणासाठी जात होते.

Screenshot

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुर्वांकच्या घरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असताना दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी बॅनरला धडकली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.

दुर्वांक याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला प्रथम दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने २६ ऑक्टोबर रोजी त्याला मुंबई येथे उपचारांसाठी नेण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच बुधवारी त्याची प्राणज्योत मालवली.

मित्राच्या घरी जेवणासाठी जात असताना घर अगदी जवळ आलेले असतानाच हा दुर्दैवी अपघात घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अल्पवयीन दुर्वांकच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दापोली पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *