चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव यांना जमिनीच्या खरेदीखताची सातबारा उताऱ्यावर नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. बुधवारी (५ ऑगस्ट) दुपारी मंडळ अधिकारी कार्यालयात ही धडक कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी एका ४८ वर्षीय निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने ३ ऑगस्ट रोजी एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
तक्रारदारांनी त्यांच्या पत्नीच्या नावे मौजे सावर्डे येथील गट क्रमांक १३४७/३ मधील २१८ चौ.मी. जागा खरेदी केली होती. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर फेरफार मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अनिल जाधव यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीने सापळा रचला. दुपारी ३.१० वाजता तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारून ती स्वतःजवळील नोटबुकमध्ये ठेवण्यास सांगत असताना जाधव यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली, रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे तसेच संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, श्रेया विचारे, हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षीरसागर आणि प्रशांत कांबळे यांनी सहभाग घेतला.
नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी होत असल्यास किंवा भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ वर किंवा रत्नागिरी एसीबी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













