राज्यात इंधन तुटवड्याची चर्चा सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड समुद्र परिसरात एका मच्छिमारी बोटीवर मोठ्या प्रमाणात इंधनसाठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी कस्टम विभागाने संशयित बोटीवर धडक कारवाई करत इंधनाचा मोठा साठा जप्त केला असून, बोटीसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयगड समुद्र परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी समुद्रात गस्त वाढवत ‘शहाना’ नावाच्या मच्छिमारी बोटीची तपासणी केली. या झाडाझडतीदरम्यान बोटीवर मोठ्या प्रमाणात इंधनसाठा आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, बोटीवर इंधनाचे ३० हून अधिक बॅरल सापडले आहेत.
विशेष म्हणजे सध्या मच्छिमारी हंगाम संपत आला असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन बोटीवर का साठवण्यात आले होते, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या इंधनाचा वापर नेमका कोणत्या उद्देशासाठी होणार होता, याचा तपास कस्टम विभागाकडून सुरू करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान संबंधित इंधनसाठा जप्त करण्यात आला असून ‘शहाना’ ही मच्छिमारी बोटही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहे. ही बोट गुहागर तालुक्यातील पडवे येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, बोटीवरील पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुढील तपासासाठी रत्नागिरी येथे आणण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणामागे इंधनाची अवैध वाहतूक, साठेबाजी किंवा अन्य कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे समजते.
या कारवाईमुळे किनारपट्टी परिसरात एकच खळबळ उडाली असून, कस्टम विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













