दापोली- खेड महामार्गावर निकृष्ट कामाचा पर्दाफाश? मोऱ्या खचल्या, रस्ते बसले, अपघातांच्या मालिकेने नागरिक संतप्त

banner 468x60

खेड–दापोली महामार्गावरील सुरू असलेल्या रस्ते बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहेत. नव्याने बांधण्यात आलेल्या अनेक मोऱ्या (कल्व्हर्ट) खचत असून त्यालगतचे रस्तेही बसल्याने मोठी भगदाडे पडत आहेत. परिणामी हा संपूर्ण मार्ग अपघातप्रवण बनला असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


सध्या सर्वाधिक गंभीर परिस्थिती नशेमन कॉलनी परिसरात निर्माण झाली आहे. येथे नव्याने बांधलेल्या मोरीलगतचा रस्ता मोठ्या प्रमाणात खचून भगदाड पडले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या भगदाडाचा विस्तार वाढत असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसात कमी दृश्यमानतेमुळे हे भगदाड वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

banner 728x90


याशिवाय मल्हार पेट्रोल पंप, नवानगर, नवानगर–महालक्ष्मी रोड, टाळसूरे मेडिकल कॉलेज बसथांबा तसेच कुंभवे जिल्हा परिषद शाळेजवळील पुलालगतही रस्ता खचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या भेगा पडल्या असून काही ठिकाणी मोऱ्यांच्या बाजूचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी, चारचाकी तसेच एसटी बस चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.


दरम्यान, गेल्या काही दिवसांत या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. कुंभवे कातळ–नवशी पाटी दरम्यान पुलावर भरधाव कार कठड्याला धडकली होती. त्याआधी कुंभवे शाळेसमोर उघड्या गटाऱ्यामुळे एक अल्टो कार अपघातग्रस्त झाली होती. तसेच टाळसूरे नवानगर येथे रस्त्यालगत ठेवलेल्या मोरीच्या पाईपवर कार आदळल्याची घटनाही घडली होती. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये जीवितहानी टळली असली तरी भविष्यात मोठा अनर्थ होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ते बांधकाम सुरू असलेल्या अनेक ठिकाणी आवश्यक इशारा फलक, परावर्तित सूचना फलक, बॅरिकेड्स, चेतावणी दिवे किंवा इतर सुरक्षाव्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. धोकादायक वळणे, पूल, उघडी गटारे आणि खचलेले रस्ते याठिकाणी योग्य खबरदारी न घेतल्याने वाहनचालकांची दिशाभूल होत असून अपघाताचा धोका वाढत आहे.


खेड–दापोली महामार्ग हा कोकणातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने दररोज शेकडो वाहने आणि हजारो प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. अशा महत्त्वाच्या मार्गावरील नव्याने उभारलेल्या मोऱ्याच अल्पावधीत खचू लागल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. निकृष्ट साहित्याचा वापर झाला का, तांत्रिक निकषांचे पालन झाले का आणि कामाच्या गुणवत्तेची तपासणी योग्य पद्धतीने करण्यात आली का, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.


नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारासह सर्व खचलेल्या ठिकाणांची तातडीने संयुक्त पाहणी करून युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षितता उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.


“महामार्गावरील या निकृष्ट कामाला जबाबदार कोण? आणखी किती अपघात आणि किती जीव धोक्यात आल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *