दापोली : वारंवार वीज खंडिततेमुळे नागरिक संतप्त, महावितरण कार्यालयावर धडक आंदोलनाचा इशारा

banner 468x60

दापोली परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सततच्या वीज खंडिततेमुळे नागरिक, पर्यटक आणि व्यावसायिक अक्षरशः हैराण झाले असून आता या प्रश्नावरून संताप उफाळून आला आहे. दिवसातून अनेक वेळा वीज जाणे, कमी-जास्त दाबाचा पुरवठा होणे आणि तक्रारींनंतरही महावितरणकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

banner 728x90

या पार्श्वभूमीवर दापोली कोंड येथील महावितरण कार्यालयावर येत्या गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार असल्याचे स्थानिक व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी स्पष्ट केले आहे. दापोलीतील हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनीही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही आठवड्यांपासून दापोली शहरासह ग्रामीण भागात दिवसातून अनेकदा अचानक वीजपुरवठा खंडित होत आहे. काही ठिकाणी तर प्रत्येक तासाला वीज जात असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. याशिवाय कमी-जास्त दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती उपकरणे तसेच व्यावसायिक वापरातील महागडी इलेक्ट्रॉनिक साधने खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत.

सध्या दापोली परिसरात पर्यटन हंगामाचे शेवटचे दिवस सुरू आहेत. समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे आणि थंड हवामानामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक दापोलीत दाखल होत आहेत. मात्र अशा वेळी वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. हॉटेल, रिसॉर्ट आणि होमस्टेमध्ये एसी, फ्रीज, पाण्याच्या मोटारी, इंटरनेट सेवा आणि लाईट व्यवस्था बंद पडत असल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत.

अनेक पर्यटकांनी “दापोलीत मूलभूत सुविधा नाहीत” अशी नाराजी व्यक्त केल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात पर्यटक या भागाकडे पाठ फिरवतील, अशी भीती स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

याशिवाय सततच्या वीज खंडिततेमुळे फ्रीज, डीप फ्रीजर, एसी, इन्व्हर्टर आणि इतर उपकरणे वारंवार बंद पडत असून हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. काही ठिकाणी व्होल्टेजच्या चढ-उतारामुळे उपकरणे जळाल्याच्याही तक्रारी पुढे येत आहेत.

स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी अनेकदा महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन उचलले जात नसल्याचा आणि तक्रारींना समाधानकारक उत्तर दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने संताप आणखी तीव्र होत आहे.

या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे, दापोलीतील वीजपुरवठा सुरळीत करावा तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्वजण एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *