चिपळूण : वालोपे अपघातात चिमुकलीसह वडिलांचाही मृत्यू, मुंबई-गोवा महामार्ग चार तास होता ठप्प

banner 468x60

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसताना रविवारी रात्री चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने चार वर्षीय चिमुकली गार्गी आग्रे हिचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेले तिचे वडील कुणाल काशिनाथ आग्रे यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

या दुर्घटनेत कुणाल आग्रे यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रे कुटुंब दुचाकीवरून प्रवास करत असताना वालोपे परिसरात भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की चार वर्षीय गार्गीचा जागीच मृत्यू झाला. तर कुणाल आग्रे आणि त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाले.

स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र कुणाल आग्रे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती परिसरात पसरताच वालोपे आणि आसपासच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. अपघातासाठी जबाबदार असलेल्या कंटेनर चालकाला तातडीने अटक करावी, तसेच कंटेनर मालकाला घटनास्थळी आणून कारवाईबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. मुंबई आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवासी चार तासांहून अधिक काळ महामार्गावर अडकून पडले. काही ठिकाणी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिस अधिकारी, ग्रामस्थ आणि आग्रे कुटुंबीय यांच्यात चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महामार्गावरील धोकादायक वळणे, भरधाव अवजड वाहने, अपुरी सुरक्षा उपाययोजना आणि निष्काळजी वाहनचालक यामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांनंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याबद्दलही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *