Breaking News
संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी संगमेश्वर: देवरुखात पिग्मी एजंट महिलेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू राजापूर : 22 वर्षीय मतिमंद तरुणीवर तिघांकडून अत्याचार, तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल संपूर्ण दापोली अंधारात! सकाळी 10 पासून वीज गायब, रात्री 8 वाजेपर्यंतही पुरवठा पूर्ववत नाहीदिवसभर वीज नसल्याने नागरिकांचे हाल, महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी

संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे कथित बेकायदेशीर गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आले असून, या प्रकरणी खासगी डॉक्टर डॉ. विजय नारकर याच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील संबंधित दांपत्याविरुद्ध देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डॉक्टर आणि महिलेच्या पतीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने दोघांनाही २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एक दांपत्य १९ नोव्हेंबर रोजी गर्भपातासाठी संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील डॉ. विजय नारकर याच्याकडे आले होते. यावेळी १६ ते १८ आठवड्यांच्या गर्भाचा बेकायदेशीर गर्भपात करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेदरम्यान संबंधित महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने तिला पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.


जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांनी केलेल्या तपासणीनंतर या प्रकरणाचे गांभीर्य समोर आले. जिल्हा शल्यचिकित्सकांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर देवरुख पोलिसांनी कारवाई करत डॉक्टर आणि संबंधित दांपत्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पीसीपीएनडीटी कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू असून, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
लांजा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम यांनी देवरुख पोलीस ठाण्यात भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाच्या निमित्ताने गर्भपातासाठी वापरण्यात आलेली औषधे नेमकी कोठून उपलब्ध झाली, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित औषधांची खरेदी कोणाकडून करण्यात आली होती? त्यासाठी आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे होती का? औषध विक्रेत्यांकडून नियमांचे पालन झाले होते का? या बाबींची चौकशी होणे आवश्यक आहे. औषधांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील नोंदी तपासल्यास या प्रकरणातील पुरवठा साखळी स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाची भूमिका आणि या प्रकरणातील संभाव्य औषध पुरवठादारांची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.


२०२४ मधील प्रकरणाशीही संबंध?
डॉ. विजय नारकर याच्यावर यापूर्वी मार्च २०२४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कथित अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणातही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या प्रकरणात तो नववा आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी करवीर पोलिसांनी रत्नागिरी जिल्ह्यात येऊन त्याला अटक केली होती. तसेच त्याच्या दवाखान्यातून गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.


यापूर्वीच्या प्रकरणानंतर पुन्हा अशाच स्वरूपाचा आरोप समोर आल्याने साखरपा येथील प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. संबंधित डॉक्टरने यापूर्वीही अशा प्रकारचे कृत्य केले होते का, या प्रकरणात आणखी व्यक्ती सहभागी आहेत का आणि कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये औषधांचा पुरवठा करणारी काही साखळी कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे.


स्त्रीभ्रूणहत्या आणि अवैध गर्भलिंग निदानासारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कारवाई करणे आवश्यक आहे. साखरपा प्रकरणात पोलिसांच्या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि औषध पुरवठ्यापासून कथित बेकायदेशीर प्रक्रियेपर्यंत आणखी कोणाचे धागेदोरे उघड होतात, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.