संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटीवळे आणि करंजारी परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री पाच घरांना लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी घरातील ऐवजावर डल्ला मारला. या घटनांमध्ये प्राथमिक माहितीनुसार सुमारे ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून, घरफोड्यांच्या या मालिकेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घाटीवळेतील मुसलमान वाडीत तीन घरे फोडली
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सर्वप्रथम घाटीवळे गावातील मुसलमान वाडीला लक्ष्य केले. येथील अब्दुल रहमान फोडकर, इकबाल उमर फोडकर आणि अब्दुल मज्जिद शिरगावकर यांच्या बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील ऐवजाची चोरी करून चोरटे पसार झाले.
एकाच वाडीत तीन घरफोड्या झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दीड किलोमीटर अंतरावरील करंजारी गावातही चोरी
घाटीवळे येथे चोरी केल्यानंतर चोरट्यांनी सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गालगत असलेल्या करंजारी गावाकडे मोर्चा वळवला. येथे चंद्रकांत शिवराम भुर्के यांच्या बंद घरासह बाबा वळंजु यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले.
बाबा वळंजु हे कामानिमित्त घराबाहेर गेले असताना चोरट्यांनी संधी साधून घरात प्रवेश केला. या दोन्ही घरांमधून प्राथमिक माहितीनुसार सुमारे ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले आहे.
कुलूप तोडले अन् पुन्हा दुसरे कुलूप लावले!
या चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे बाबा वळंजु यांच्या घरातील चोरीची पद्धत. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि चोरी केल्यानंतर त्याच कडी-कोंड्याला दुसरे कुलूप लावून तेथून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.
चोरी केल्यानंतरही घराला दुसरे कुलूप लावण्याच्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमकी कोणती युक्ती वापरली आणि त्यांचा या परिसरात किती काळापासून वावर होता, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
महामार्गालगतच्या घरांनाही लक्ष्य केल्याने चिंता
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गालगत असलेल्या घरांमध्येही चोरीच्या घटना घडल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. एकाच रात्री दोन गावांमध्ये पाच घरे फोडण्यात आल्याने चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
या घटनांबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून, चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि घरफोड्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
घाटीवळे आणि करंजारी परिसरातील या घरफोड्यांमागे कोणाचा हात आहे, चोरट्यांनी नेमका किती ऐवज लंपास केला आणि या प्रकरणाचा तपास कशा दिशेने जाणार, याकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













