दापोली : ठाकरे गटाला मोठा धक्का! क्षेत्रप्रमुख मुजीब रुमाणे यांचा राजीनामा

banner 468x60

दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे दापोली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रप्रमुख मुजीब अलीमिया रुमाणे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा अधिकृतपणे सुपूर्द केला. ऐन राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रप्रमुखांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने दापोलीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुजीब अलीमिया रुमाणे यांनी आपल्या राजीनामा पत्रात वैयक्तिक अडचणींमुळे आपण स्वखुशीने पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी हा निर्णय घेताना कोणावरही आरोप केलेले नसून, राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला आहे.

उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्याकडे २५ ऑक्टोबर रोजी राजीनामा सुपूर्द केल्यानंतर ही बाब समोर आली. विधानसभा मतदारसंघ स्तरावर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिल्याने स्थानिक राजकारणात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.

पक्षात काम करत असताना या वरिष्ठ नेत्यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्याचबरोबर दापोली विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांचे तालुकाप्रमुख, पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी आभार मानले आहेत.

विशेष म्हणजे, रुमाणे यांनी केवळ क्षेत्रप्रमुखपदाचा राजीनामा दिलेला नसून पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाकडे केवळ पद सोडण्यापुरते न पाहता, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *