गुहागर : दुसरीच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण, शिक्षकाला जन्मठेप

banner 468x60

गुहागर तालुक्यातील एका मराठी शाळेत दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात चिपळूण येथील विशेष न्यायालयाने आरोपी शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उदय नामदेव वेल्हाळ असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, न्यायालयाने त्याला जन्मठेपेसह दंडाचीही शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी हा निकाल दिला.

आईच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

ही घटना मार्च २०२० मध्ये घडली होती. आरोपी उदय वेल्हाळ हा संबंधित शाळेत पीडित मुलीला शिकवत होता. ७ मार्च २०२० रोजी मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर ती लंगडत चालत असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. मुलीच्या चालण्यात झालेला हा बदल पाहून आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी मुलीने शिक्षकाकडून आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली.

या प्रकारामुळे हादरलेल्या आईने तत्काळ गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. भारतीय दंड विधानातील कलम ३७६(क) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या पोक्सो कायद्यातील विविध कलमांनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी चिपळूण येथील न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

दहा साक्षीदारांची साक्ष

या खटल्याचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच पीडित मुलीच्या आईचे निधन झाले होते. मात्र, त्यानंतरही न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिली. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता पुष्पराज शशिकांत शेट्ये यांनी न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडली.

सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षींचा विचार करून न्यायालयाने आरोपी उदय वेल्हाळ याला दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय त्याला दंडही ठोठावण्यात आला.

पोलिसांच्या तपास पथकाची भूमिका

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील यांनी केला. न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. भंडारी आणि ए. एस. शिंदे यांनी भूमिका बजावली.

बालवयातील विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या या गंभीर प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळांसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी मुलांच्या संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी, जागरूकता आणि प्रभावी यंत्रणेचे महत्त्वही या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *